लीफ्ट देण्याचा बहाणा करुन पाठीला लावली बंदूक
प्रतिनिधी / मिरज
लीफ्ट देण्याचा बहाणा करुन एका 25 वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाने मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांची लुटमार करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर रस्त्यावर पोलिस उपाधीक्षकांच्या बंगल्यासमोरच ही घटना घडली. कांबळे हे प्रसंगावधान राखत आपली गाडी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात वळवताच संबंधीत तरुण मोटारसायकलीवरुन उडी मारुन पसार झाला. याबाबत कृष्णदेव कांबळे यांनी मिरज शहर पोलिसात अनोळखी तरुणाविरुध्द विरुध्द तक्रार दिली आहे.
कांबळे हे भोसे गावातील रहिवाशी असून, मिरज पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी ते मोटारसायकल (MH-10-CV 8425) वरुन मिरज पंचायत समिती कार्यालयाकडे येत होते. कांबळे हे मिरज-पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल थ्रिईजजवळ आले असता सावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावजळ सुमारे 25 वर्षे वयाचा एक अनोखळी तरुण तोंडाला रुमाल बांधून निळा शर्ट आणि निळ्या रंगाची सॅक आडकवून थांबला होता. त्याने कृष्णदेव कांबळे यांना हात करुन थांबवले. व लिफ्ट द्या म्हणून तो गाडीवर बसला.
कांबळे हे मोटारसायकल सुरू करुन पुढे जात कुठे सोडू असे विचारले असता सदर तरुणाने कांबळे यांच्या पाठीवर बंदूक लावली. त्यानंतर शर्टाच्या वरील शिखातील मोबाईलही काढून घेतला. आपली लुटमार होत असल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी आपली मोटारसायकल तेथून जवळच असलेल्या मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वळवली. तेवढ्य़ात संबंधीत तरुणाने गाडीवरुन उडी मारली. कांबळे यांचा मोबाईल परत देऊन धुम ठोकली. कांबळे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर सदर तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर तो पसार झाला होता. दरम्यान, मिरज पंढरपूर रस्त्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाणे आणि पोलिस उपाधीक्षकांचा बंगला आहे.