सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आठ घरफोडयांची कबुली
प्रतिनिधी / मिरज
मिरज पूर्व भागातील अनेक गावांत घरफोड्या आणि जबरी चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने बेळंकी (ता. मिरज) येथून गजाआड केले. युवराज उर्फ शंकर ईश्वरा भोसले (वय 19, रा. सरकारी वसाहत, बेळंकी) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल, मोबाईल, रोकड, दागिने असा 1 लाख, 8 हजार, 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस खाकी दाखविताच सदर चोरट्याने तब्बल आठ घरफोडयांची कबुली दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात विशेषतः पूर्वभागातील गावांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू होते. मोटारसायकली, मोबाईल चोरी तर नित्याची बाब बनली होती. याशिवाय घरफोडी, ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमधील साहित्याची चोरी, शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी चोरी, दागिने चोरी, जनावरे चोरी अशा वेगवेगळ्या फिर्याफी ग्रामीण पोलिसात दाखल झाल्या होत्या.
वाढत्या चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधात होते. पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार युवराज उर्फ शंकर ईश्वरा भोसले (पारधी) हा बेळंकी येथे काळ्या मोटरसायकलीवरून फिरून एक मोबाईल कमी किमतीत विकत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने जबरी घरफोड्या आणि चोऱ्यांची कबुली दिली. तो आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने मिळून मालगाव, लिंगनूर, बेडग, मल्लेवाडी, गुंडेवाडी, बेळंकी आदी गावात चोऱ्या केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकली, मोबाईल असा 1 लाख, आठ हजार, 300 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत हकेला आहे. चोरीच्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार पसार झाला आहे.