मिरज शहरात घरफोड्य़ांचे सत्र सुरुच
प्रतिनिधी/मिरज
शहरातील शासकीय दूध योजनेचे भांडारगृह फोडून 97 हजार, 300 रुपयांचे विविध साहित्य लंपास करण्यात आले. याबाबत शंकर रामचंद्र सुतार (वय 57, रा. ए 2, शासकीय दूध योजना निवासस्थान, डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्य़ांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ शासकीय दूध योजना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूध योजना बंद असून, इमारतीमधील भांडारगृहात विविध साहित्य ठेवण्यात आले आहे. चोरटय़ांनी दूध योजनेतील भांडारगृह फोडून मशिनरींचे साहित्य, ड्रील मशिन, बॅगल ग्रॉयडल, इनलेट व्हॉल्व आणि गेज ग्लास असा सुमारे 97 हजार, 300 रुपयांचा चोरुन नेला. शासकीय दूध योजनेतील कर्मचारी भांडारगृहात पाहणी करण्यासाठी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, मिरज शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून घरफोड्य़ांचे सत्र सुरूच आहे. तानाजी चौकात किराणा दुकान फोडून 600 हजारांचे ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शासकीय दूध योजनेची इमारत फोडून चोरी झाल्याने घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.