प्रतिनिधी/मिरज
मिरज शासकीय रुग्णालय सध्या अनेक महत्वाचे विभाग बँड आहेत. येथे सुविधा उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी मी मिरजकर फाऊंडेशनने केली आहे. तसे निवेदन अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांना देण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर केले आहे. त्यामुळे येथील सर्वच विभाग बंद आहेत. एमआरआय, सिटीस्कॅन, बाह्य रुग्ण विभाग, महिला रोग, बाल रोग विभाग, औषधे आदी सर्वच विभाग बंद आहेत. परिणामी रुग्णांना सांगली येथील वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने तेथे त्यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे मिरज शासकीय रुग्णालयात महत्वाचे विभाग सुरू करावे तसेच रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मी मिरजकर फाऊंडेशनने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.