प्रवासी संख्या कमी असल्याने रेल्वेचा प्रस्ताव : लांब पल्ल्याच्या पॅसेंजर एक्स्प्रेस म्हणून धावणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. महसूल जमा होत नसल्याने तोटय़ात असलेल्या रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मध्य रेल्वेने मिरज-हुबळी तसेच कोल्हापूर-मनगुरू या रेल्वे कायमच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.
लांब पल्ल्याच्या पॅसेंजर रद्द करून त्या एक्स्प्रेसमध्ये रुपांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वेचा आहे. 150 कि. मी. पेक्षा अधिक अंतरावर धावणाऱया पॅसेंजर आता एक्स्प्रेसमध्ये रुपांतरित होणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पॅसेंजर सेवेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तोटय़ात असणाऱया रेल्वे विभागाला फायद्यात आणण्यासाठी हा उपक्रम रेल्वे विभाग करीत आहे. कोरोनानंतर अद्याप मिरज येथून पॅसेंजर धावलेल्या नाहीत. त्या लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसदेखील रद्द
मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस बेळगाववरून धावत होती. या रेल्वेमधून मिळणारा महसूल कमी असल्याने ही रेल्वे यापुढे कायमची बंद केली जाणार आहे. कोल्हापूर-मनगुरु (तेलंगणा) या दरम्यान धावणारी एक्स्प्रेस यापुढे रद्द केली जाणार आहे. याचसोबत मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई सहय़ाद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात येणार आहेत.
150 कि. मी. पेक्षा अधिक अंतर धावणाऱया पॅसेंजर यापुढे एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत. त्यामुळे मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक या पॅसेंजर आता एक्स्प्रेसमध्ये रुपांतरित होणार आहेत. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यास अद्याप मध्य रेल्वेने हिरवा कंदील दिला नसल्याने त्या पॅसेंजर आता एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
नवीन रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव
- बेळगाव-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस)
- मिरज-मंगळूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस)
- बेंगळूर-हजरत निजामुद्दीन (राजधानी एक्स्प्रेस)
- वास्को-हजरत निजामुद्दीन (गोवा हमसफर एक्स्प्रेस)
- यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन (हमसफर एक्स्प्रेस)