कराडात नवरात्र उत्सवात बंदोबस्त वाढवला
प्रतिनिधी/ कराड
कोरोना रुग्ण संख्येचा धडकी भरवणारा आकडा कमी आला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा नवरात्र उत्सवही नियमांच्या चौकटीत साजरा करण्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुर्गादेवी आगमनावेळी मिरवणुका, वाद्यांचा वापर आणि गर्दी करून महाआरती करता येणार नाही. कराडकर नागरिकांनी गणेशोत्सवात दाखवलेला संयम नवरात्र उत्सवातही दाखवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले.
शनिवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे व्यवहार सुरळीत झाले असले, तरी सण, उत्सवातील गर्दी टाळावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात नियम अटींची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी पोलिसांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी दुर्गादेवी आगमनावेळी मिरवणुकीला बंदी आहे.
गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी
तालुक्यात कोरोनाचा आकडा अजूनही फारसा कमी नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवात काहीशी मुरड घालावी लागणार आहे. हे समाजहित जोपासताना दांडिया, महाप्रसाद, मनोरंजनात्मक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले.