डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मनपात बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून मिरवणूक मार्गावर चरी आणि खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, तसेच मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्या, अशा विविध सूचना विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱयांनी केल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पूर्वतयारी बैठक सोमवारी घेण्यात आली. महापालिका सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मिरवणूक मार्गाबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. कोरोनामुळे दोन वर्षे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली होती. पण यंदा 131 वी जयंती साजरी करण्यात येणार असून शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध परिसरातील मंडळे सहभागी होणार आहेत.
पण सध्या मिरवणूक मार्गाची दुरवस्था झाली असून राणी चन्नम्मा चौकाकडे जाणाऱया काकतीवेस रोडवर खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱया देखाव्यांच्या वाहनांना अडचणी निर्माण होत असतात. तसेच झाडांच्या फांद्या आडव्या येत असल्याने धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे प्रथम रस्त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. तसेच झाडांच्या फांद्या हटविण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे वनखाते, पथदीप देखभाल विभाग आणि मनपाच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक आयोजित करून समस्यांबाबत चर्चा करून निवारण करण्यात याव्यात, अशी मागणी विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱयांनी केली. त्यामुळे संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महापालिका कार्यालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाची पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी, सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, दलित संघटनांचे पदाधिकारी मल्लेश चौगुले, अर्जून देमट्टी, मल्लेश कुरंगी, शिवपुत्र मेत्री आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.