सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
अमेझॉन प्राइमची वेबसीरिज ‘तांडव’वरून वाद अद्याप पूर्णपणे शमला नसतानाच आता ‘मिर्झापूर’ सीरिजवरून वाद सुरू झाला आहे. उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्हय़ाची प्रतिमा मलीन करण्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने सीरिजचे निर्माते आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविले आहे.
‘मिर्झापूर’ वेबसीरिजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. याचा पहिला सीझन 2018 मध्ये अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम करण्यात आला होता. दुसरा सीझन 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात स्ट्रीम करण्यात आला. मिर्झापूर एक क्राइम ड्राम वेबसीरिज असून याची कथा पूर्व उत्तरप्रदेशातील अनेक जिल्हय़ांवर गुंफण्यात आली आहे.
सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी एका गुन्हेगारी टोळीचे प्रमुख अखंडानंद त्रिपाठी म्हणजेच कालीन भैय्या ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेचा अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे. अली फजल, दिव्येंदु शर्मा, विक्रांत मैसी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि कुलभूषण खरबंदा यांनी यात महत्त्वाची भूमिका साकारल्या आहे.
यापूर्वी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि जिल्हय़ाची प्रतिमा मलीन करण्याच्या आरोपांवरून निर्माते सिधवानी, अख्तर आणि भौमिक गोंडलिया विरोधात भादंविचे कलम 295 अ, 504 आणि 505 अंतर्गत मिर्झापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती.