मंगळवेढा येथील घटना : दोन भावंडेही बुडाली
वार्ताहर / सावंतवाडी:
सोलापूर मंगळवेढा येथील एका तलावात एकाच कुटुंबातील तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात येथील मिलाग्रीस हायस्कूलचा आठवीतील विद्यार्थी रयान इक्बाल मुलाणी (13) याचा समावेश आहे. रयान हा उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक इक्बाल मुलाणी यांचा मुलगा होय. बुधवारी ते आपल्या मंगळवेढा गावी मोठय़ा मुलीला आणण्यासाठी गेले होते.
सोलापूर-मंगळवेढा येथे इक्बाल मुलाणी यांचे घर आहे. तेथे त्यांचे भाऊ व अन्य कुटुंबीय राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक तलाव आहे. या तलावात गेल्या दोन दिवसात पाणी भरले होते. गुरुवारी सायंकाळी मुलाणी यांच्या कुटुंबातील त्यांच्या भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा व त्यांचा मुलगा रयान या तिघांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
रयान मिलाग्रीसचा विद्यार्थी
इक्बाल मुलाणी हे उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. बाहेरचावाडा येथे ते पत्नी, दोन मुलगे व एक मुलीसह राहतात. त्यांची मोठी मुलगी गेले काही महिने मंगळवेढा येथे गेली होती. तिला सावंतवाडीत आणण्यासाठी मुलाणी, त्यांची पत्नी व दोन्ही मुलगे बुधवारी सोलापूर येथे स्वत:च्या वाहनाने गेले होते. बुधवारी सायंकाळी ते तेथे पोहोचले. गुरुवारी एक दिवस राहून शुक्रवारी ते गावी येणार होते. गुरुवारी सायंकाळी रयानचा बुडून मृत्यू झाला. तसेच मुलाणी यांच्या भावाचा व बहिणीचा मुलगा यांचाही बुडून मृत्यू झाला. एकाच घरातील तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेनंतर सावंतवाडीतून मुलाणी यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व शाळेतील शिक्षकांनी मंगळवेढा गावात धाव घेतली. मिलाग्रीस हायस्कूलमध्ये रयान हा गतवर्षी सातवीत होता. तो हुशार, मनमिळावू होता. त्याला बॅडमिंटनची आवड होती. फादर रिचर्ड सालदाना, शिक्षिका अनिता सडवेलकर व वि. स. खांडेकर हायस्कूलचे शिक्षक पवार व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.