प्रतिनिधी/ दापोली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुड येथील नवीन बंगल्याच्या बांधकामाबाबत तक्रार झाल्यावर त्यांनी रविवारी स्वतःच आपल्या बंगल्याचे बांधकाम तोडले.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता बंगला बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. येथे भेट देण्यासाठी सोमय्या स्वतः दोनवेळा दापोलीत आले होते. नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्रकिनाऱयावर 72 गुंठे जागा घेतली असून त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम सुरु केले. तसेच मोठय़ा प्रमाणात जंगल व झाडांची नासधूस केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. शिवाय हा बंगला पाडून टाकावा, यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱयांपासून ग्रामसेवकापर्यंत लेखी तक्रारी केल्या होत्या. अखेर या तक्रारींना कंटाळून नार्वेकर यांनी स्वतःच आपल्या बांधत असलेल्या बंगल्यावर हातोडा चालवला असल्याचे बोलले जात आहे. या बाबत दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
महसूल विभागाकडून कारवाई नाही
या बाबत मुरुडचे मंडल अधिकारी दिलीप शिगवण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला या प्रकाराबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. शिवाय नार्वेकर यांचा बंगला तोडून टाकण्याबाबत महसूल विभागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे महसूल विभागाने ही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हा बंगला हा मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडण्याचे काम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.