सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासाठी 2022 या वर्षाची सुरुवात अत्यंत उत्तम ठरली आहे. उर्वशीला ‘मिशन पानी जल शक्ती’ जल संरक्षण मोहिमेच्या नॅशनल ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अभिनेत्रीने याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
उर्वशीने इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर केल्या असून यात ती जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासोबत दिसून येतेय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जलशक्ती मंत्री शेखावत यांनी मला ही जागतिक स्तरीय संधी दिल्याबद्दल आभार असे तिने म्हटले आहे.
अभिनेत्रीने उर्वशी रौतेला फौंडेशनच्या माध्यमातून जलसंकटावर मात करण्यासाठी कार्य केले आहे. फौंडेशनकडून उत्तराखंडच्या पौडी, गढवाल आणि हरिद्वारमध्ये शेकडो लोकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचविण्यास मदत करण्यात आली आहे. यापूर्वी उर्वशीला अबूधाबीचा टूरिझम ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून जाहीर करण्यात आले होते.