राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची जोडी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जौहरने स्वतःचे प्रॉडक्शन हाउस धर्मा प्रॉडक्शन्सचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेज माही’ची घोषणा केली आहे. करणने इन्स्टाग्रामवर चित्रफिती प्रसारित करत याची माहिती दिली आहे. चित्रफितीत चित्रपटातील व्यक्तिरेखांबद्दल सांगण्यात आले आहे.
या नव्या चित्रपटाची कथा क्रिकेटशी संबंधित असल्याचे यात आढळून येते. कारण चित्रफिती क्रिकेटचे समालोचनही ऐकू येते. चित्रपटात अभिनेता राजकुमार राव हा महेंद्र नावाची व्यक्तिरेखा तर जान्हवी कपूर ही महिमा नावाची भूमिका साकारत आहे.
चित्रफितीच्या प्रारंभी राजकुमार आणि जान्हवी कपूर हे ‘कधी कधी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन लोकांची गरज भासते’ असे म्हणत असल्याचे ऐकू येते. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. निखिल मल्होत्रा आणि शरण शर्मा यांच्या पटकथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्स करत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करणार आहे.
राजकुमार आणि जान्हवी यांची जोडी याच वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित ‘रुही’ चित्रपटात दिसून आली होती. चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती लाभली होती.