पोर्तो रिको / वृत्तसंस्था
मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेचा ग्रँड फिनाले इव्हेंट कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया मानसा वाराणसीसह 17 स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोनाबाधित झालेल्या सर्वांना पोर्तो रिकोमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱयांची परवानगी मिळाल्यानंतर सर्व सौंदर्यवतींना घरी परतण्याची परवानगी दिली जाणार आहे.
पोर्तो रिको हा अमेरिकेच्या कॅरिबियनच्या अँटिल्स भागातील एक प्रांत आहे. पोर्तो रिकोमधील ग्रँड फिनालेचा कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता होणार होता. परंतु कोरोनामुळे तो अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 90 दिवसात याच ठिकाणी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
भारतातर्फे मनसा वाराणसी ही 23 वषीय सौंदर्यवती या स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. मनसा ही यापूर्वी ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’ ठरली होती. ती तेलंगणामधील रहिवासी असून ती आर्थिक विनिमय माहिती विश्लेषक म्हणून सध्या काम करते. तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. ती लहानपणी खूप लाजाळू होती. तिचे वडील कामानिमित्त मलेशियाला गेले होते. मनसाने मलेशियातील ग्लोबल इंडियन स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शाळेतील अनेक उपक्रमांमध्ये ती भाग घेत असे. त्यानंतर ती भारतात परतली आणि तिने आपले पुढील शिक्षण सुरू ठेवले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका खासगी कंपनीत ती काम करत आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्येही डंका वाजवणारी प्रियांका चोप्रा ही तिची आयडॉल आहे.