ऑनलाईन टीम / मुंबई :
अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष्य द्यावे, मी अजून राष्ट्रवादीकडे वळालेलो नाही, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
केंदीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून आपल्याला काय निधी मिळणार, असा प्रश्न माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला होता. त्यावर अजित पवार यांनी सुक्ष्म आणि लहान खात्यातून आपल्याला काय निधी मिळणार, अशी टीका राणेंवर केली होती. त्या टीकेला राणेंनी आज सकाळी प्रत्युत्तर दिले होते. अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष्य द्यावे, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असा पलटवार राणे यांनी केला होता.
राणेंच्या या पलटवारावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मला या गोष्टीची जास्त चर्चाच करायची नाही. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे, ते आम्ही चालवत आहोत. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच केंद्राचं काम करावं आम्ही आमचं राज्याचं काम करतो.