ऑनलाईन टीम / पुणे :
स्त्री भ्रूण हत्येच्या विषयात जनमानसात सकारात्मकता जागविण्यापासून स्वत:मधील सामर्थ्य ओळखण्यापर्यंतचा प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आला. एक शायर जन्माला येण्यासाठी काय लागते, हे सांगणारे वैशिष्टयपूर्ण गीत सादर करुन शब्द आणि त्याच्या अर्थामधील वैविध्य पुणेकरांनी अनोख्या अशा आरव पुणे निर्मित मी गातो माझे गाणे या स्वरमैफलीतून अनुभविले.
निमित्त होते, युवा संगीतकार निखील महामुनी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांनी लिहिलेल्या गीते सादरीकरण कार्यक्रमाचे. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात निखील महामुनी, ॠचा महामुनी, डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांनी सादरीकरण केले. तर, अनिल आठलेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मैफलीची सुरुवात निखील महामुनी यांनी मी गातो माझे गाणे या भावलेल्या कवितांच्या रचनांचा कार्यक्रम असलेल्या प्रमुख गीताने केली. डॉ.माधुरी जोशी-चव्हाण यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना निखील महामुनी यांनी चढविलेला स्वरसाज रसिकांच्या पसंतीस उतरला. प्रत्येकाला परमेश्वराने जे दिले आहे, ते ओळखा. कोणालाही कमी लेखू नका, असा अर्थ सांगणारी बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते… ही रचना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली.