केरळमधील चित्रपटनिर्माते अली अकबर यांची घोषणा : धर्मांधांवर नाराज होत घेतला निर्णय
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
देशाचे पहिले सरसेनापती (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. पूर्ण देश त्यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेला असताना काही लोक सोशल मीडियावर याची थट्टा उडवत होते. कट्टरवाद्यांच्या याच कृत्यांमुळे दुःखी होत मल्याळी चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांची पत्नी लुसीअम्मा यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटनिर्माते अली अकबर यांनी फेसबुक लाइव्हवर स्वतः आणि पत्नी इस्लाम धर्मातून बाहेर पडत हिंदू धर्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली. त्यांनी स्वतःचे नाव बदलून ‘रामसिंहन’ ठेवले आहे. कट्टरवादी आणि धर्मांध मुस्लिमांच्या कृत्याला वरिष्ठ मुस्लीम नेते आणि इस्लामिक धर्मगुरुंनीही विरोध केला आही. देशाच्या शूर पुत्राचा असा अपमान स्वीकारार्ह नसल्याचे अकबर यांनी म्हटले आहे.
आजपासून एक भारतीय
मला जन्मापासून जी वस्त्रं मिळाली होती, ती आता मी उतरवत आहे. आजपासून मी मुस्लीम नाही. मी एक भारतीय आहे. भारताच्या विरोधात हसत स्माइली पोस्ट करणाऱयांसाठी हा माझा संदेश असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे. अकबर यांच्या पोस्टवर अनेक जण त्यांना विरोध करत आहेत, तर अनेकांकडून पाठिंबा देखील मिळतोय.
जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूच्या वृत्तावर हसणारे बहुतांश जण मुस्लीम होते. जनरल रावत यांनी पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पावले उचललेली असल्याने असे करण्यात आले. मी अशा धर्मासोबत जोडलेला राहू शकत नाही. मी स्वतःच्या मुलींना धर्म बदलण्यास भाग पाडणार नाही, याचा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यावा असे अकबर यांनी म्हटले आहे.
धर्मांधांकडून क्रूरचेष्टा
अली अकबर यांनी सीडीएस रावत यांच्या निधनावर एक लाइव्ह व्हिडिओ तयार करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांच्या या व्हिडिओवर काही धर्मांधांनी हसणारा इमोजी शेअर केला होता. काही जणांनी सीडीएस रावत यांच्या मृत्यूची चेष्टाही केली होती. अली यांच्या या व्हिडिओनंतर फेसबुकने त्यांच्या पोस्टला वंशभेदी ठरवत त्यांचे अकौंट सस्पेंड केले होते. त्यानंतर अली यांनी स्वतःचे नवे फेसबुक अकौंट तयार करत सीडीएस रावत यांच्या मृत्यूवर हसणाऱयांना शिक्षा करण्याची मागणी करत धर्मांतराची घोषणा केली.