वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सोशल मीडियावर ‘आय रिटायर’ असा संदेश पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. पण नंतर तिने याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर सर्वांचा जीव भांडय़ात पडला. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली नकारात्मकता, भीती आणि अनिश्चितता यांना रिटायर केले असल्याचे तिने नंतर स्पष्ट केले.
ऑलिम्पिक रौप्यविजेती सिंधू सध्या लंडनमध्ये आहे. ‘डेन्मार्क ओपन ही शेवटची स्पर्धा असून मी निवृत्त होत आहे,’ असा संदेश देत तिने चाहते व बॅडमिंटनप्रेमींना जोरदार धक्का दिला. पण नंतर तिने याचे स्पष्टीकरण केल्यानंतर सर्वांना हायसे वाटले. डेन्मार्क ओपनमधून तिने कोरोना महामारीच्या कारणास्तव माघार घेतली होती, त्यासंदर्भात तिने ही पोस्ट केली होती. ‘डेन्मार्क ओपनमध्ये मला देशाचे प्रतिनिधित्व करता आले नाही, पण यापुढे असे होणार नाही. माघार घेण्याची ही माझी शेवटची स्पर्धा आहे,’ असे तिने स्पष्ट केले. ‘भावनिक अस्वस्थता, नकारात्मकता, सततची भीती आणि अनिश्चितता यातून आज मी निवृत्त होत आहे. अनभिज्ञ गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, या भावनेतूनही मी आज निवृत्त होत आहे,’ असे तिने पुढे स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची किती गरज आहे, यासाठी तिने हा संदेश दिला होता. पण प्रथमदर्शनी पोस्ट पाहिल्यानंतर सर्व क्रीडाप्रेमी संभ्रमात पडले होते. संपूर्ण तपशील पाहिल्यानंतर मात्र त्यांना दिलासा मिळाला आणि तिने व्यक्त केलेल्या भावनेलाही पाठिंबा दिला.