जगात अनेक ठिकाणी खाल्ल्या जातात मुंग्या
मुंग्यांचा भोजन म्हणून वापर करणे लोकांना अत्यंत अजब वाटते. परंतु छत्तीसगडच्या आदिवासी भागांमध्ये मुंग्यांद्वारे तयार चटणीचा आहारात समावेश केला जातो. बस्तर जिल्हय़ात 23 वर्षीय युवकाने स्वतःच्या ढाब्यामध्ये अशी चटणी वाढण्यास सुरुवात केली आहे. जगात अनेक ठिकाणी मुंग्यांचा वापर आहाराच्या स्वरुपात केला जातो, अनेक ठिकाणी त्यांना प्रकृतीसाठी अत्यंत उत्तम आणि वय वाढविणारा घटक म्हणूनही पाहिले जाते.
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात लोक मुंग्यांची शिकार देखील करतात. तेथील मध्य सेंटेडर भागात होर्मिगॅस क्यूलोनस प्रजातीच्या मुंग्या किंवा बिग बट नावाने प्रसिद्ध मुंग्यांची रितसर शिकार करण्यात येते. कोलंबियामध्ये मार्च-एप्रिलनंतर मुसळधार पावसानंतर मुंग्यांच्या प्रजननाचा हंगाम सुरू होतो. याच दोन महिन्यांमध्ये लोक अधिकाधिक मुंग्या जमा करू लागतात. तेथे मुंग्यांना अत्यंत आवडीने खाल्ले जाते आणि त्यांची किंमत कोलंबियन कॉफीपेक्षाही अधिक असते.
मेक्सिकोमध्येही मुंग्या खाण्याचे प्रचलन आहे. तेथे उडणाऱया मुंग्या विशेषकरून पावसाळय़ात पकडल्या जातात आणि तळून अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये त्यांचा वापर केला जातो. या मुंग्यांचा टॉपिंग्स म्हणूनही वापर केला जातो.
ब्राझीलमध्ये क्वीन अँट मोठय़ा प्रमाणात खाल्ल्या जातात. तेथे त्यांना तळून स्नॅक्सच्या स्वरुपात किंवा चॉकलेटमध्ये बुडवून खाण्यात येते. एकेकाही मुंग्या येथील गरीबांच्या आहाराचा मुख्य पदार्थ होत्या. परंतु आता ब्राझीलच्या पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी ठिकाणी देखील त्यांचा आहारात समावेश केला जातो. लाओस आणि उत्तरपूर्व थायलंडमध्ये मुंग्यांची अंडी खाल्ली जातात. तेथे त्यांना प्रोटीनचा मोठा स्रोत मानले जाते.