प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ातील घाटमाथ्यावरील सात तालुक्यातील 126 ग्राम पंचायतीची निवडणूक 27 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या प्रक्रियेला यापूर्वीच (11 डिसेंबर) सुरुवात झाली आहे. त्यामुळे जोयडा, दांडेली, हल्याळ, शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि मुंदगोड तालुक्यातील ग्रामीण प्रदेशातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हय़ातील भाजप पक्षाने ग्राम पंचायत निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतले आहे. हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. कामगार आणि साखर मंत्री व जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांनी रविवारी मुंदगोड नगरात ग्राम पंचायती निवडणुकांच्या निमित्ताने पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांचा अभिप्राय जाणून घेतला. यावेळी वायव्य रस्ते वाहतूक मंडळाचे अध्यक्ष व्ही. एस. पाटील, युवा नेते विवेक हेब्बार, जिल्हा पंचायत सदस्य रवीगौडा पाटील, एल. टी. पाटील, नागभूषण हावणगी आदी उपस्थित होते.
आमदार रुपाली नाईक यांची हाणकोण आणि घोटेगाळीला भेट
दरम्यान, कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनीही कारवार तालुक्यातील हाणकोण आणि घोटेगाळी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार रुपाली नाईक म्हणाल्या, ग्राम पंचायत निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या गोंधळाला वाव न देता शांत वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे. कोविड-19 ची खबरदारी घेऊन अधिक प्रमाणात मतदान कसे होईल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा सल्ला पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी कारवार तालुक्यातील ग्रामीण अध्यक्ष सुभाष गुणगीसह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.