क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आक्रमक आणि दिमाखदार खेळाचे दर्शन घडवित बेंगलोर एफसीने मुंबई सिटी एफसीला 4-2 गोलानी पराभव करून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत दमदार विजय साकारला. काल बांबोळीत जीएमसी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला.
मध्यंतराला विजयी बेंगलोर एफसीचा संघ दोन गोलानी आघाडीवर होता. बेंगलोर एफसीसाठी आपला 200वा सामना खेळणारा कप्तान सुनील छेत्री संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने या सामन्यात दोन गोल केले. या व्यतिरिक्त क्लिटॉन सिल्वाने दोन गोल केले. मुंबई एफसीचे दोन्ही गोल ऍडम फोंड्रा याने नोंदविले. विजयाच्या तीन गुणानी आता बेंगलोर एफसीचे 18 सामन्यांतून पाच विजय, सात बरोबरी आणि सहा पराभवाने 22 गुण झाले असून ते आता सहाव्या स्थानावर आले आहेत.
मुंबई एफसीला या स्पर्धेत तिसरा पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे आता 17 सामन्यांतून दहा विजय, चार बरोबरी आणि तीन पराभवाने 34 गुण झाले. या निकालाने एटीके मोहन बागानचे 36 गुणानी पहिले स्थान अबाधित राहिले. मुंबई सिटी आता दुसऱया, नॉर्थईस्ट युनायटेड 26 गुणांनी तिसऱया स्थानावर आहेत. एफसी गोवा आणि हैदराबाद एफसीचे प्रत्येकी 24 गुण आहेत, मात्र सरस गोलसरासरीवर एफसी गोवा चौथ्या तर हैदराबाद एफसी पाचव्या स्थानावर आहेत. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला बेंगलोरच्या क्लिटॉन सिल्वाने उदांता सिंगच्या पासवर सनसनाटी गोल करून आघाडी मिळविली. त्यानंतर मुंबईच्या ऍडम फोंड्राने अहमद जाहूच्या पासवर गोल करण्याची संधी दिशाहिन फटका हाणून गमवली. दुसऱयाच मिनिटाला बेंगलोर एफसीच्या एरीक पार्तालूने हाणलेला शक्तीशाली फटका मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने अडविल्यानंतर क्लिटॉन सिल्वाने सिस्को फर्नांडिझने दिलेल्या पासवर बेंगलोर एफसीचा दुसरा गोल केला आणि आघाडी वाढविली.
दुसऱया सत्रातील दुसऱयाच मिनिटाला मुंबईने गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. यावेळी विग्नेश दक्षिणमूर्ती आणि फोंड्रेने रचलेल्या चालीवर जॅकीचंद सिंगचा फटका बाहेर गेला. त्यानंतर 50व्या मिनिटाला गॉड्डार्डच्या पासवर ऍडम फोंड्राने अमरिंदर सिंगला भेदले आणि मुंबई सिटीचा पहिला गोल केला.
मुंबई सिटी आता बेंगलोरला संघर्ष करणार असे वाटत असताना सुनील छेत्रीने तिसरा गोल केला आणि संघाची आघाडी 3-1 अशी वाढविली. त्यानंतर मुंबईच्या जॅकीचंद सिंग आणि बेंगलोरच्या क्लिटॉन सिल्वाचे गोल करण्याचे यत्न प्रतिस्पर्धी गोलरक्षकांनी अडविल्यानंतर ऍडम फोंड्राने मुंबईचा दुसरा गोल केला आणि सामन्यात रंगत आणली. शेवटच्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोल नोंदवून बेंगलोर एफसीला 4-1 असे विजयी केले. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार दोन गोल करणाऱया सुनील छेत्रीला
मिळाला.