मडगाव : हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीची आज शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हैदराबाद एफसीविरुद्ध लढत होईल. मुंबई सिटीची स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होत असून गुणतक्त्यातील आघाडी आणखी वाढविण्याचा त्यांचा निर्धार असेल.
मुंबई सिटीने दहा सामन्यांत विक्रमी आठ विजय नोंदविले असून 25 गुणांनी ते सध्या अग्रस्थानावर आहेत. स्पेनचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाच्या कामगिरीत सतत सुधारणा होण्यावर भर आहे. आतापर्यंतच्या निकालाबाबत मी समाधानी आहे. अशी स्थिती कायम राखणे फार अवघड आहे. आमच्यासाठी गुणतक्ता नव्हे तर संघाच्या कामगिरीतील सुधारणा महत्त्वाची आहे, असे लॉबेरा म्हणाले. मुंबई सिटीने गेल्या नऊ पैकी प्रत्येक सामन्यात गोल केला आहे. त्यात ते अपराजित राहिले असून आतातर्यंत त्यांनी 17 गोल केले आहेत. त्यांचा बचाव सुद्धा चांगला राहिला आहे.