रणजी चषक : सुर्यकुमार यादवची एकाकी झुंज, रहाणे, पृथ्वी शॉ अपयशी
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील ब्रांदा-कुर्ला कॉप्लेक्स मैदानावर सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत ब गटातील कर्नाटकविरुद्ध सामन्यात मुंबईचा पहिला डाव 55.5 षटकांत 194 धावांवर आटोपला. सुर्यकुमार यादवने झळकावलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला दीडशेचा टप्पा गाठता आला. यानंतर, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्नाटकने 24 षटकांत 3 बाद 79 धावा केल्या होत्या. आर. समर्थ 40 धावांवर नाबाद राहिला.
प्रारंभी, कर्नाटकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार करुण नायरचा हा निर्णय सार्थ ठरवताना गोलंदजांनी मुंबईला 194 धावांवर गुंडाळले. सलामीला आलेल्या आदित्य तरेला भोपळाही फोडता आला नाही. कसोटी स्पेशालिस्ट अजिंक्य रहाणे 7 तर सिद्धेश लाड 4 धावा काढून बाद झाला. युवा फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला. मिथुनने त्याला बाद करत मुंबईला चौथा धक्का दिला. पृथ्वीने 6 चौकारासह 29 धावांचे योगदान दिले. कर्णधार सुर्यकुमार यादवने मात्र 94 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 77 धावांची संयमी खेळी साकारल्यामुळे मुंबईचा दीडशेचा टप्पा गाठता आला. शशांक आतर्डेने 6 चौकारासह 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 55.5 षटकांत 194 धावांवर आटोपला गेला. कर्नाटककडून कौशिकने सर्वाधिक 3 तर अभिमन्यु मिथुन, रोनित मेरे व प्रतिक जैन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
कर्नाटकचे सलामीचे फलंदाज माघारी
मुंबईच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना कर्नाटकच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर देवदत्त पडीकलला 32 धावांवर शाम्स मुलाणीने तंबूत धाडले. अभिषेक रेड्डी या युवा फलंदाजाला मुलाणीने शुन्यावर बाद केले. रोहन कदमही 4 धावांवर बाद झाला. आर. समर्थने मात्र 6 चौकारासह नाबाद 40 धावा करत दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्नाटकने 24 षटकांत 3 बाद 79 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 55.5 षटकांत सर्वबाद 194 (पृथ्वी शॉ 29, सुर्यकुमार यादव 77, आतर्डे 35, कौशिक 3/45, मिथुन 2/48, रोनित मोरे 2/47).
कर्नाटक प.डाव 24 षटकांत 3 बाद 79 (आर. समर्थ खेळत आहे 40, पडिकल 32, मुलाणी 2/13, आतर्डे 1/14).
इतर सामन्यांची स्थिती-
- झारखंड 50 षटकांत 4 बाद 170 वि जम्मू व काश्मीर. (रांचीमध्ये)
- केरळ 41 षटकांत 7 बाद 126 वि हैदराबाद (हैदराबादमध्ये)
- राजस्थान 151 वि आंध्र प्रदेश 29 षटकांत 2 बाद 82 (जयपूरमध्ये)
- हि. प्रदेश 175 वि मध्य प्रदेश 29 षटकांत 4/87 (धरमशालामध्ये)
- बडोदा 201 वि रेल्वे 5.4 षटकांत 2 बाद 24 (बडोद्यामध्ये)
- आसाम 92 षटकांत 5 बाद 237 वि उत्तराखंड (डेहराडूनमध्ये)
- मणिपूर 106 वि गोवा 57 षटकांत 2/225