वार्ताहर / पुसेगाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना वयाच्या 74 व्या वर्षी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज पुसेगाव (ता. खटाव) या मूळगावी येरळा नदीकाठी करण्यात आला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
धनंजय जाधव यांचे मुळ गाव सातारा जिह्यातील पुसेगाव असून त्यांचा जन्म s1947 साली झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी MSc ची पदव्युत्तर पदवी घेतली होती.प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. 1972 ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि आय पी एस अधिकारी म्हणून ते धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. 1992 मध्ये पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2002 मध्ये त्यांना अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती देऊन महामार्ग सुरक्षा रक्षक पथक प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2007 ते 2008 या काळात त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली.याच पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी एमपीएससी बोर्डवर दोन वर्षे काम केलं. नंतर त्यांच्या मुळ गावी, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी पोतदार इंग्लिश शिक्षण संस्था सुरु केली. तसेच शेतीत उत्तम प्रकारे विकास करून शेत तळे, जनावरांचा गोठा उभारणी करत फळबागा ची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे.
धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर विविध राजकीय पक्ष त्यांना राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र शेवट पर्यंत ते राजकारणा पासून ते अलिप्त राहिले. मात्र त्यांचे धाकटे बंधू ऍड. श्रीकृष्ण जाधव यांना पुसेगावचे सरपंच करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.