ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ करण्यात आली असून, महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
भाजप नेते आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात वाद सुरू आहे. या दरम्यानच महापौर बंगल्यावर गुरुवारी सायंकाळी हे धमकीचे पत्र आले. माझ्या दादाकडे वाकडय़ा नजरेने पाहू नका नाहीतर वाईट परिणाम होतील, अशा आशयाचे हे पत्र असून, त्यामध्ये अश्लील भाषा वापरुन शिवीगाळही करण्यात आली आहे. महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळय़ा घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पेडणेकर थोडय़ाच वेळात पोलिसांत तक्रार दाखल करणार असून, कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत. मागील वषी जून महिन्यात पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता हे निनावी पत्र प्राप्त झाले आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणात त्यांना अटक होणार असल्याची बातमी येत असतानाच ऑन टेबल जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर पेडणेकर यांना धमकीचे पत्र गेल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वाढली आहे.