स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अपहत मुलगी व आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी / सातारा
मुंबई ठाणे येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून आणून साताऱयात लपून राहत असलेल्या युवकास मुलीसह ताब्यात घेवून त्या दोघांना ठाण्याच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्याची कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलीय. याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.
ठाणे येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात एका युवकाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून आणले होते. ते दोघेही सातारा शहर परिसरात वास्तव्य करत होते. याबाबतची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास पथकाला त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाने सातारा एस. टी. बसस्थानक परिसरातील लॉजेस व परिसरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर अपहत मुलगी व आरोपीचा शोध घेतला. मात्र सापडत नव्हते. हेच पथक या आरोपीचा शोध घेत असून राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नमुद वर्णनाचा मुलगा व मुलगी हायवेवरुन कोल्हापुरकडे निघालेल्या एक मालगाडीत जाताना दिसून आले. पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेत अपहत मुलीची सुटका केली. अल्पवयीन मुलगी व आरोपी युवकाला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे बोरीवली पूर्व मुंबई यांच्याकडे ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार दिपक मोरे, पोलीस नाईक शरद बेबले, मुनीर मुल्ला, निलेश काटकर चालक संजय जाधव, पोलीस नाईक मोना निकम, राधा जगताप, तनुजा शेख व यांनी सहभाग घेतला होता.