मुंबापुरीत 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन : मराठा आरक्षणप्रश्नी वेधणार सरकारचे लक्ष
प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
मराठा आरक्षणविषयी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज रविवारी मुंबईत तब्बल 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची तयारी झाली असून पोलिसांची परवानगी घेऊन लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. दरम्यान, शनिवारी ठाण्यात मराठा आंदोलकांनी साखळी उपोषण करत मराठा समाजातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थागिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने राज्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. रविवारी मुंबईतील वीस ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील (कोल्हापूर) यांनी दिली. या आंदोलनाच्या तयारीसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक झाली. त्यानुसार कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.
ठाण्यात साखळी उपोषण, सोलापुरात पालकमंत्र्यांना घेराव
मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज ठाणेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे येथे शनिवारी साखळी उपोषण सुरू केले. यामध्ये प्रवीण पिसाळ, रमेश आंबरे, स्नेहा गावकर, संतोष पालांडे, विलास येवले, कैलास पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले हेते. सोलापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालत आरक्षणाची मागणी केली. सोलापूरमध्ये सोमवार 21 रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याची तयारीही कार्यकर्ते करत आहेत.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सोमवारी 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात राज्य सरकारचे प्रतिकात्मक बारावे घालून निषेध करणार आहे. आरक्षणाला स्थगिती मिळून सोमवारी बारा दिवस पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनोखे, लक्षवेधी आंदोलन कोल्हापुरात होणार आहे.
मुंबईत या ठिकाणी होणार आज ठिय्या आंदोलन
1) प्लाझा सिनेमा, दादर (पश्चिम), 2) भारतमाता टॉकीज, लालबाग, 3) शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ, चेंबुर, 4) वरळी, 5) गिरगाव, 6) कलानगर जंक्शन, बांद्रा (पूर्व), 7) शिवस्मारक विमानतळ पश्चिम दूतगती मार्ग, सांताप्रुझ, 8) खार, 9) जोगेश्वरी, 10) बोरिवली, 11) दहीसर (पूर्व), 12) दहीसर (पश्चिम), 13) कांदिवली, 14) मालाड, 15) कांजूर मार्ग, 16) भांडुप, 17) मुलूड, 18) शिवाजी महाराज पुतळा, विक्रोळी (पूर्व), 19) मानखुर्द, 20) घाटकोपर.