ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाली. मात्र, त्यानंतर नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे असा कोणताही प्रकार नागरिकांनी पाळलेला दिसला नाही. याचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईकरांना कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आणि न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील 4 वॉर्डांमध्ये झपाट्याने कोरोना वाढतोय. चेंबुर, टिळक नगर, बोरिवली, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते आहे. रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ होताना दिसत आहे.
चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक 0.26% एवढा आहे. 98% रुग्णसंख्या वाढीच्या केसेस इमारतींच्या भागातून येत आहेत. त्यामुळेच नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या निवासी इमारतींना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
- मुंबईत 721 नवे रुग्ण
मुंबईत मागील 24 तासात 721 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर 421 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण आकडा 3,15,751 वर पोहोचला असून मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर 22 फेब्रुवारी नंतर मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.