ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्याची पिढी मोबईलच्या जाळ्यात अडकली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक मुलांचे मोबाईल हेच विश्व झाले आहे. त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 16 वर्षी मुलाने झ्ळँउ हा गेम खेळण्यासाठी आई वडिलांच्या अकाऊंटमधून 10 लाख रूपये काढल्याचा घटना घडली. ऑनलाईन गेमिंग सेशन्ससाठी त्याने दहा लाख रूपये काढले. एवढेच नाही तर यानंतर हा मुलगा घर सोडून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले आणि तो घरातून पळून गेला कारण त्याच्या पालकांनी त्याला पबजी खेळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केल्याबद्दल फटकारले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्हस परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या पालकांकडे परत पाठवले.
दरम्यान, जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात राहणाऱया दास दाम्पत्याने 25 ऑगस्ट रोजी त्यांचा 16 वषीय मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. मुलगा अल्पवयीन असल्याने एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट 10 चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक धनराज चौधरी, मुस्कान पथकातील जगदीश धारगळकर आणि दिलीप माने यांच्या पथकाने मुलाचा शोध सुरू केला. मुलाचा स्वभाव, घरातील वादविवाद याबाबत दास दाम्पत्यांकडून जाणून घेताना वेगळीच माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांच्या मुलाला ‘पबजी’ खेळण्याची सवय जडली होती. गेमसाठी ‘आयडी’ आणि ‘यूसी’ प्राप्त करण्यासाठी त्याने आईच्या बँक खात्यामधून ऑनलाइन तब्बल दहा लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे खर्च केल्याचे लक्षात आल्यावर आईवडील त्याच्यावर संतापले. यामुळे रागाच्या भरात तो घरातू निघाला. ‘मी घरातून निघून जात आहे, परत कधीच येणार नाही’ अशी चिठ्ठी लिहून त्याने घर सोडले.
पोलीस पथकाकडून अविरत शोध सुरू असताना दुसऱया दिवशी अंधेरी पूर्वेकडील महाकाली गुंफा परिसरात हा मुलगा एकटाच फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले आणि पुढील कारवाईसाठी त्याचा ताबा एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आले आहे.