नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलचे दर 29 पैसे प्रतिलिटर आणि पेट्रोल 19 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीमुळे आता आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दर ‘शंभरी’जवळ पोहोचला असून डिझेल दराने 91 रुपये प्रतिलिटरच्या पुढे मजल मारली आहे. मुंबईत पेट्रोल 99.32 रुपये तर डिझेल 91.01 रुपये प्रतिलिटरने विक्री केले जात आहे.
इंधन दरात शुक्रवारी झालेल्या वाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोल 93.04 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 83.80 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी इंधनदरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, त्यापूर्वी दोन दिवस पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाल्यामुळे राजस्थानच्या श्रीगंगानगर, मध्यप्रदेशच्या भोपाळ, अनूपपूर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे दरांनी यापूर्वीच ‘शंभरी’पार झेप घेतली होती. पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका आटोपल्यानंतर पुन्हा एकदा दरवाढीला सुरुवात झाली आहे.