ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात टाळेबंदी असताना अंधेरीत मर्सिडीज कारमधून दारूची तस्करी करणाऱ्याला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून 35 हजार रुपये किमतीची परदेशी बनावटीची दारू आणि मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी दीपक राजेश मकवाना याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम भागात एक तरुण मर्सिडीज कारमधून परदेशी बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून अर्बन तडका हॉटेल समोरील, म्हाडा सिग्नलजवळ एक मर्सिडीज कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये परदेशी बनावटीची 35 हजार रुपयांची दारू आढळली. पोलिसांनी दारुसह मर्सिडीज कार जप्त केली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस तपास करत आहेत.