ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात बंदी असलेल्या मेथामफेटॅमिन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तरुणाला महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) मुंबई विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून 35 लाख रुपये किंमतीचे 320 ग्रॅम मेथामफेटॅमिन जप्त करण्यात आले आहे.
रोहन गवांस (वय 36) असे या मेथामफेटॅमिन तस्कराचे नाव आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली असून, त्याला 13 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गावांस याने स्वत:च्या कारमध्ये एका छुप्या कप्प्यात मेथामफेटॅमिनचे 320 ग्रॅमचे पाऊच लपवले होते. डीआरआयला याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपीला वॉरंट बजावून कार दाखवण्यास सांगितले. आरोपी वास्तव्यास असलेल्या सोसायटीतील सदस्यांच्या उपस्थितीत या कारची डीआरआयने तपासणी केली. तेव्हा कारच्या एका छुप्या कप्प्यात अंमली पदार्थांचा साठा मिळाला.
मेथामॅफेटॅमिन या अंमली पदार्थाच्या उत्पादनास आणि विक्रीस भारतात बंदी आहे. मात्र, तरी देखील हा पदार्थ भारतात ‘स्पीड’ आणि ‘आईस’ या दोन नावांनी उच्चभ्रूंच्या पार्टीत चोरून विकला जातो.