प्रतिनिधी / मुंबई
कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारे आकडे समोर आले आहेत. मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 62वर गेली आहे तर आज दिवसभरात महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नियमांचं पालन करा आणि घरात सुरक्षित राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईमध्ये 57, ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल अद्याप माहिती येणं बाकी आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 5 नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता 19 वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी 4 रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून 01 रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील 03 रुग्ण हे लग्न सोहळयाशी संबंधीत असून 01 रूग्ण कोरोनाबाधित रूग्णाचा सहवासित आहे. नवीन रूग्णांपैकी कल्याण पुर्व येथील रूग्ण हा एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्ण कस्तुरबा रूग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.