चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आज लढत
वृत्तसंस्था/ शारजा
तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचे या मोसमात अतिशय खराब प्रदर्शन झाले असून शुक्रवारी विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांची पुढील लढत होणार आहे. आस्तित्वासाठी संघर्ष करणारा चेन्नई संघ या सामन्यात युवा खेळाडूंना आजमावून पाहण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होणार आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गमविल्यानंतर आपल्या संघाचे आव्हान संपुष्टात आले असल्याचे कर्णधार धोनीने म्हटले असले तरी त्यांना 14 गुण मिळविता येणे अजूनही शक्य आहे. मात्र यासाठी त्यांना उरलेले चारही सामने जिंकण्याची गरज आहे. यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याची अंधुकशी संधी त्यांना मिळू शकते. मागील दोन मोसमात शानदार प्रदर्शन केल्यानंतर या वयस्करांच्या संघाचा जोम आता संपला आहे, असे त्या सामन्यानंतर या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले होते. 2018 मध्ये चेन्नईने जेतेपद मिळविले होते तर मागील वर्षी त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चेन्नईने निसटता विजय मिळविला होता. पण त्यानंतर या संघाची घसरण होत गेल्याचे दिसून आले. राजस्थान रॉयल्सकडून तर त्यांना दणदणीत मार खावा लागला असून अष्टपैलू ब्रॅव्हो जखमी झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे.
राजस्थानविरुद्ध चेन्नईचे फलंदाज संघर्ष करीत असल्याचे दिसले होते. त्यामुळे धोनीने सूचित केल्याप्रमाणे, खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंना या सामन्यात संधी दिली जाते का, हे पहावे लागेल. फॅफ डय़ु प्लेसिस वगळता धोनीसह अन्य कोणत्याही फलंदाजाला फॉर्म मिळालेला नाही. अपयशी ठरलेल्या केदार जाधवला सतत संधी दिल्याबद्दल संघव्यवस्थापनावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे या सामन्यात त्याच्या जागी जगदीशन किंवा ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते. मात्र त्यांची गाठ बलाढय़ मुंबईशी पडणार असल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मुंबईने सलग पाच सामने जिंकल्यानंतर त्यांची विजयी घोडदौड रविवारी झालेल्या डबल सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने रोखली होती.
चार वेळा जेतेपद मिळविणारा मुंबई संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून खचलेल्या सीएसकेसमोर त्यांच्या गोलंदाजीतील वैविध्य आव्हान उभे करू शकते. शारजा हे मैदान सुरुवातीला गोलंदाजांसाठी अवघड ठिकाण बनले होते. पण हळूहळू तेथील खेळपट्टी मंदावली असल्याने गोलंदाजांनाही त्याचा लाभ होऊ लागला आहे. मुंबईचे फलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असून डी कॉक त्यात आघाडीवर आहे. याशिवाय रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनीही उत्तम कामगिरी केली आहे. तसेच प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पोलार्ड व हार्दिक पंडय़ा यांनी स्फोटक फलंदाजी करीत संघाला यश मिळवून दिले आहे. मुंबईच्या गोलंदाजांची कामगिरीही उत्कृष्ट झाली आहे. मात्र कोल्टर नाईलच्या जागी जेम्स पॅटिन्सनला संधी देण्याचा ते विचार करण्याची शक्यता आहे. शुक्रवारचा सामना जिंकल्यानंतर मुंबई संघ प्लेऑफच्या समीप पोहोचणार आहे तर किंचितशी संधी असणारा चेन्नई संघ पत राखण्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डॉ कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
सीएसके : धोनी (कर्णधार), एम. विजय, रायुडू, डु प्लेसिस, वॅटसन, जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, इम्रान ताहिर, सँटनर, हॅझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, एन.जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, आर.साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.