मुंबई/प्रतिनिधी
कोरोना निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी उत्सवावर बंदी घातली होती. पण मनसेने कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी फोडणारच असा इशारा राज्य सरकारला दिला होता. त्याप्रमाणे मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, दहीहंडीवेळी राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे याआधी मनसेने स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. दरम्यान, सरकारच्या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
मनसेच्या अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट करत दहीहंडीचे थर लागणारच असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड गर्दी – सरकारची डोळेझाक. युवासेना कार्यकर्त्यांचा मोठा जमाव राणेंच्या घराबाहेर धुडगूस घालतो – सरकारचं दुर्लक्ष सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांना नियमबाह्य गर्दी. सरकारला फरकच पडत नाही. राज्यभर राजकीय मेळावे तुडुंब गर्दीत सुरुच. सरकारची आळीमिळी गुपचिळी. मग आम्ही आमचे सण साजरे का करायचे नाहीत? असा सवाल त्यांनी केला होता.