सोबतचे पाचजण मात्र ‘निगेटिव्ह’ : युवतीवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू, प्रकृती स्थिर : ‘ग्रीन झोन’च्या उंबरठय़ावर पुन्हा कोरोनाचे संकट
- ओटवणे येथे गरोदर महिलेला सोडून गेलेला चालक कोरोना पॉझिटिव्ह
- त्या महिलेचे कोरोना रिपोर्ट मात्र आले निगेटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुक्त झालेला सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोन प्रवेशाच्या उंबरठय़ावर असतानाच सिंधुदुर्ग जिल्हय़ावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले आहे. मुंबई येथून आलेल्या कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथील एका 17 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चिंता वाढली असून चाकरमान्यांच्या कोकणात येण्याच्या मुद्दय़ावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील एका गावात एका गरोदर महिलेला कारने सोडून परत गेलेला कोल्हापूर येथील चालक पॉझिटिव्ह आला आहे. मात्र सुदैवाने त्या गरोदर महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाचे संकट देशावर ओढवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 26 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मंगलोर एक्सप्रेसमधून प्रवासादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार करण्यात येऊन 3 एप्रिलला त्या रुग्णाचे दोन्ही कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाला 9 एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर 28 दिवस पूर्ण होताच सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोनमध्ये प्रवेश करणार होता. 28 दिवस पूर्ण होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच जिल्हय़ात पुन्हा एकदा दुसरा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाची लागण झालेली 17 वर्षीय युवती मुंबईहून 20 एप्रिलला कुटुंबियांसह सातजण जिल्हय़ात आले होते. जिल्हय़ात प्रवेश केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांची कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉट झोनमधून आल्यामुळे त्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा नमुना अहवाल निगेटिव्ह आला, तर या युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर मुलीमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत. आता जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एक अशी झाली आहे.
नवीन पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
महिलेला सोडून गेलेला मामा कोरोना पॉझिटिव्ह
सावंतवाडी तालुक्यात ओटवणे येथील एक गरोदर महिला मुंबई येथून आली आहे. तिला सावंतवाडी येथे सोडण्यासाठी आलेले तिचे मामा बुधवारी कोल्हापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्या गरोदर महिलेची तपासणी करण्यात आली असून तिचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तिने 25 एप्रिल 2020 रोजी जिल्हा रुग्णालय येथे एका अपत्यास जन्म दिला असून माता व बाळ दोन्ही तंदुरुस्त आहेत. दरम्यान त्या महिलेसोबत तिची आई असल्याने आईचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हय़ात आणखी 28 रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आणखी 28 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आणखी 33 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 69 रुग्ण दाखल आहेत. जिल्हय़ातून तपासणीसाठी आजपर्यंत एकूण 349 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर अजून 33 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आरोग्य विभागातर्फे बुधवारी 2720 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्हय़ात 228 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 110 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
घरीच अलगीकरण 0228
संस्थात्मक अलगीकरण 0110
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0349
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0316
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0002
निगेटिव्ह आलेले नमुने 0314
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0033
विलगीकरण कक्षात दाखल 0069
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0001
बुधवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2720
सोनवडेमधील 300 कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू
पोलीस, आरोग्य व महसूल विभागाने समन्वयाने राबवलेल्या नियोजनामुळे जिल्हय़ात कोरोनाचा प्रसार रोखता आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या युवतीस वेळीत अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच या कुटुंबियांना सिंधुदुर्ग येथे घेऊन आलेले वाहन चालक पुन्हा मुंबई येथे परतले आहेत. त्याविषयी मुंबई येथे प्रशासनास माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. कोरोना बाधित 17 वषीय युवती व तिचे संपूर्ण कुटुंब जिल्हा रुग्णालयात आहेत. हे कुटुंब मुंबईहून आपल्या मूळ गावी येत होते. परंतु त्यांना गावी जाण्यापूर्वी कुडाळ येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. असे असले, तरी कुडाळ तालुक्मयातील सोनवडे गावातील 1300 कुटुंबांसह परिसरातील तीन किलोमीटरचा भाग आरोग्यदृष्टय़ा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मयत झाल्याने हे कुटुंब आपल्या गावी येत होते. त्यांच्याजवळ पास देखील होता. चालकासह एकूण सातजण 20 एप्रिल रोजी मुंबईहून आले होते. गावात जाण्यापूर्वीच त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना कुडाळ येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. तर चालक मुंबई येथे परतला होता. त्यानंतर 25 रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले व त्यांचे स्वाब घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर 17 वषीय युवतीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. तत्पूर्वी तिच्या चुलत भावाला श्वसनाचा त्रास होता. मात्र उर्वरित कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे कुटुंब गावात पोहोचले नसले, तरी त्या सोनवडे गावामध्ये आरोग्यचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच कोरोना बाधित युवती आणखी कोणाच्या संपर्कात आली आहे का? त्याचीही तपासणी सुरू आहे. मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक येथून काही लोक सिंधुदुर्ग जिल्हय़ात आल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.