अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 4 जुलै 2021, सकाळी 10.30
● लॉकडाऊनवर नागरिक संतप्त ● पॉझिटिव्हीटी दर 8.84 टक्क्यांवर ● शनिवारी अहवालात 790 बाधित ● 8,934 जणांचे नमुने तपासले● जिल्ह्यात 3,005 बेड रिक्त ● ऑक्सिजनसह 2,103 बेड रिक्त ● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 1,795 रुग्ण ● निर्बंध वाढविल्याने नागरिक नाराज● जिल्हाधिकारी साहेब, कसे जगायचे?
सातारा / प्रतिनिधी :
मुंबईत काल 661 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या फक्त 8498 रुग्ण उपचारात आहेत. याच्या उलट स्थिती सातारा जिल्ह्यात आहे. दैनंदिन बाधित वाढ 800 ते 900 पटीत सुरू असून, ॲक्टिव्ह रुग्ण संख्या दहा हजाराच्या घरात आहे. कोरोना मुक्तीचा वेगही घटला असून पॉझिटिव्हिटी दर वाढल्यानेे जिल्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटला गेला आहे. कोट्यवधी लोकसंख्येची मुंबई आटोक्यात येत आहेे तर साताऱ्यासह सांगली कोल्हापूरमध्ये उपयोजना सुरू असूनही आटोक्यात येत नाही, याचे जनतेला आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, शनिवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा 790 जणांचा अहवाल बाधित आला. या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 8.84 टक्के एवढा राहिलेला आहे.
निर्बंध वाढल्याने जिल्हावासीय नाराज
जिल्ह्यातील नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आहेत. मात्र तरी देखील जिल्ह्यात लॉकडॉऊन केला तरी रुग्ण संख्या तेवढीच आणि लॉकडॉऊन उठवला तरी रुग्ण संख्या तेवढीच याचे गणित नागरिकांना समजेनासे झाले. लॉकडाऊन होता तर मग कराडमधील मधील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला परवानगी कशी दिली? किती गर्दी जमली ? येथे नियम मोडले गेले असा सवाल नागरिक विचारत आहेत. मुंबई सारखे शहर कोरोनाच्या जोखडातून मुक्त होऊ शकत आणि सातारा अजून पण लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकतोय याचंच आश्चर्य वाटतय ? नक्की कोणाच चुकतंय कळतं नाही पण भरडला जातोय सामान्य माणूस जगण्यासाठी नक्की करायचं तरी काय? 2 महिने लॉक डाऊन मधून आता कुठं दुकाने चालू झाली तर पुन्हा तेच पाढे पंचावन्न चालू.
लोकभावनांचा आक्रोश ऐका तरी
सातारकरांच्या जगण्याला काही एक अर्थ तरी राहिलाय का? जगण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून ? बाकी देणी वगैरे दूरच राहिले. किमान बँक पतपेढ्या यांनाही सूचना द्याव्यात की पुढील 3 महिने कोणालाही हप्ते भरण्यास तगादा लावू नये तिथं पण लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी, अशा मागणी करणाऱ्या हजारो प्रतिक्रिया प्रशासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर पडलेल्या आहेत. प्रशासनाने कधीतरी वेळ काढून त्या वाचाव्यात.
साहेब, सर्वसामान्य लोकांनी कसे जगायचे?
जिल्हाधिकारी साहेब लॉकडाऊन करताना सामान्य लोकांच्या अडीअडचणी पण लक्षात घ्या. कृष्णा कारखाना इलेक्शन चालू होते, हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर होते. त्यावेळी आपण लक्ष दिले नाही आणि इलेक्शन संपले की लगेच लॉकडाऊन लागू केले. साहेब सामान्य लोकांनी कसे जगायचे हे तरी आपण सांगा. एक तर कामधंदा नाही, त्यात महागाई वाढली आहे. त्यात कर्जाचे हप्ते, दुकान – घर भाडे, लाईट बिल, विविध कर कसे भरायचे…? लोक रोज घरी येत आहेत त्यांना काय उत्तर दयायचे. आता गहाण ठेवायला ही काही शिल्लक राहिले नाही. लॉकडाऊन लागून आत्महत्या करण्यापेक्षा ते कोरोनाने मेलेलं बरं असेच आता वाटू लागले आहे. नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया खूप भयानक आहेत.
लॉकडॉऊनला आमचा विरोध आहे
माहिती कार्यालयाच्या या फेसबुक पेज वरील प्रतिक्रिया अशीच आहे. आपला या बंदला विरोध आहे. व्यापारी आणि सर्व व्यापारी सदस्य आणि अध्यक्ष सभासदाचे महासंघाचे यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि सगळे व्यापारी जमा करून याबद्दल बंदला विरोध केला पाहिजे, निवडणूक होतायत, सरकारी पगार चालू फक्त सामान्य व्यापारी व लोकांना lockdown. सामान्य माणसांची गर्दी झाली की ती बेकायदेशीर, राजकीय लोकांची गर्दी झाली की ती मात्र कायदेशीर? निषेध आहे या असल्या प्रशासनाचा. आता तर मला वाटतय हा शासकीय कोरोना आहे.लोकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कमिशनर बदलला जातो तर सातारा कलेक्टर अपयशी ठरत असूनही येथेच ठाण मांडून का ? का त्यांनाही काही टारगेट दिले आहे काय ? असाही सवाल जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर नागरिकांकडून विचारला गेला आहे.
पॉझिटिव्हिटी दर 8.84
शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 8,934 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत यामध्ये 790 जणांचा अहवाल बाधित आला त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 8.84 एवढा आहे. Rt-pcr चा दरावर जिल्ह्याला पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे आता यापुढे जनतेकडून याला लॉकडाऊनला कसा प्रतिसाद मिळेल हे सांगताही येत नाही.
शनिवारी जिल्ह्यात बाधित 973, मृत 18, मुक्त 407, तपासणी 9,407
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 11,06,180, एकूण बाधित 1,95,839, घरी सोडण्यात आलेले 1,82,557, मृत्यू -4,450, उपचारार्थ रुग्ण-10,405