वृत्तसंस्था/ अबु धाबी
कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसची चिंता असली तरी विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न काहीशा कमकुवत झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी होणाऱया सामन्यात करणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबईने चेन्नई सुपर किंग्सचा एकतर्फी धुव्वा उडवित पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. याउलट राजस्थान रॉयल्सला आधीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून 8 गडय़ांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. गुणतक्त्यात आघाडीवर असणारे मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र राजस्थानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून ते गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहेत. येथे पराभव झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या ते जवळ पोहोचतील. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला धोंडशिरेची दुखापत झाली असल्याने तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो रविवारच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल का, हा प्रश्न आहे. मात्र शुक्रवारच्या सामन्यात त्याची गैरहजेरी अजिबात जाणवली नाही. युवा खेळाडू इशान किशनने (एकूण 261 धावा) चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवित रोहितची उणीव जाणवू दिली नाही.
क्विन्टॉन डी कॉकनेही (368 धावा) आपला उत्तम फॉर्म कायम राखत इशानला चांगली साथ देत मुंबईचा मोठा विजय साकार केला. रविवारीही रोहित खेळू न शकल्यास इशान व डी कॉक हीच जोडी सलामीला येईल. मुंबईच्या मध्यल्या फळीनेही शानदार प्रदर्शन केले असून सूर्यकुमार यादव (243), हार्दिक पंडय़ा (164), स्फोटक अष्टपैलू पोलार्ड (208), कृणाल पंडय़ा (82) यांनीही मुंबईच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. जबरदस्त फटकेबाजी करण्याची क्षमता असणारे पोलार्ड, पंडय़ा बंधू हे कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक फलंदाज आहेत. फलंदाजांप्रमाणे मुंबईच्या गोलदांजांनीही कमाल केली असून डावखुरा वेगवान गोलंदाज टेंट बोल्ट, यॉर्कर स्पेशालिस्ट बुमराह प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरले आहेत. बुमराह तर सुरुवातीला आणि अखेरीस डेथ ओव्हर्समध्ये खूपच प्रभावी ठरला आहे. या दोघांनी मिळून आतापर्यंत 33 बळी मिळविले असून नाथन कोल्टर नाईलची (2 बळी) त्यांना पूरक साथ मिळाली आहे. फिरकी गोलंदाज कृणाल (5 बळी) व राहुल चहर (13 बळी) यांनीही मधल्या षटकांत आक्रमक गोलंदाजी करीत फलंदाजांना रोखण्याचे आणि बळी मिळविण्याचे काम सहजतेने पार पाडले आहे.
राजस्थानसाठी कर्णधार स्मिथचा फॉर्म आणि आघाडी फळीचे अपयश ही सर्वात मोठी चिंता बनली आहे. स्मिथने 11 सामन्यात 265 धावा जमविल्या आहेत. या मोसमात त्यांनी आघाडी फळीत वारंवार बदल केला असून त्याचाच त्यांना फटका बसत आला आहे. त्यांच्याकडे स्टोक्स (110), संजू सॅमसन (272), जोस बटलर (271) यासारखे दर्जेदार खेळाडू आहेत. पण त्यांची एकसंध कामगिरी होताना दिसून येत नाही. त्यांच्यासाठी 2 गुण महत्त्वाचे असल्याने वरील त्रिकुट या सामन्यात तरी एकाच वेळी चमक दाखवतील, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने बाळगली आहे. राहुल तेवातियाने (224 धावा व 7 बळी) अष्टपैलू कामगिरी केली आहे. पण तो फलंदाजीस येईपर्यंत संघावरील ओझे वाढलेले असते. त्यांचे युवा खेळाडू सुरुवात चांगली करीत आहेत. त्यांना त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करण्याची गरज असून वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरल्यास त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. राजस्थानच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. आर्चरने 15 बळी घेत चमक दाखवली आहे. पण त्याला दुसऱया बाजूने पूरक साथ मिळेनाशी झाली आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डॉ कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.