आयपीएल साखळी सामन्यात विद्यमान विजेत्यांचा 13 धावांनी विजय
चेन्नई / वृत्तसंस्था
विजयाच्या मार्गावर असलेल्या एखाद्या संघाचे कसे तीन-तेरा वाजू शकतात, हे मुंबई इंडियन्सने शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध दाखवून दिले. मुंबईने हैदराबादला 13 धावांनी मात दिली, त्यावेळी प्रत्येकी 3 बळी घेणारे ट्रेंट बोल्ट व राहुल चहर हे या सनसनाटी विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 150 धावा केल्या तर प्रत्युत्तरात हैदराबादचा डाव 19.4 षटकात सर्वबाद 137 धावांवरच गुंडाळला गेला.
तुलनेने किरकोळ अशा 151 धावांचा पाठलाग करताना वॉर्नर (36) व जॉनी बेअरस्टो (22 चेंडूत 43) यांनी 7.2 षटकात 67 धावांची सलामी देत विजयाची भक्कम पायाभरणी केली होती. मात्र, बेअरस्टो, वॉर्नर बाद झाले आणि तेथून हैदराबादच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. बेअरस्टो स्वयंचीत झाल्याने मुंबईसाठी ही प्राईज विकेट ठरली.
मधल्या फळीतील अनुभवी मनीष पांडे (2), नवोदित विराट सिंग (11) स्वस्तात बाद झाले तर हाच कित्ता अभिषेक शर्मा (2), अब्दुल समद (7) यांनीही गिरवला. रशीद खानला तर खातेही उघडता आले नाही. त्यानंतर बोल्टने शेवटच्या षटकात 2 बळी घेत मुंबईला आणखी एक रोमांचक विजय मिळवून दिला.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर धावचीत (हार्दिक पंडय़ा) 36 (34 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), जॉनी बेअरस्टो स्वयंचीत गो. कृणाल पंडय़ा 43 (22 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), मनीष पांडे झे. पोलार्ड, गो. चहर 2 (7 चेंडू), विराट सिंग झे. यादव, गो. चहर 11 (12 चेंडूत 1 चौकार), विजय शंकर झे. यादव, गो. बुमराह 28 (25 चेंडूत 2 षटकार), अभिषेक शर्मा झे. मिल्ने, गो. चहर 2 (4 चेंडू), अब्दुल समद धावचीत (हार्दिक पंडय़ा) 7 (8 चेंडूत 1 चौकार), रशीद खान पायचीत गो. बोल्ट 0 (1 चेंडू), भुवनेश्वर कुमार त्रि. गो. बोल्ट 1 (2 चेंडू), मुजीब उर रहमान नाबाद 1 (1 चेंडू), खलील अहमद त्रि. गो. बोल्ट 1 (2 चेंडू). अवांतर 5. एकूण 19.4 षटकात सर्वबाद 137.
गडी बाद होण्याचा क्रम
1-67 (बेअरस्टो, 7.2), 2-71 (मनीष पांडे, 8.6), 3-90 (वॉर्नर, 11.3), 4-102 (विराट सिंग, 14.1), 5-104 (अभिषेक शर्मा, 14.5), 6-129 (अब्दुल समद, 17.4), 7-130 (रशीद, 17.6), 8-134 (विजय शंकर, 18.5), 9-135 (भुवनेश्वर, 19.1), 10-137 (खलील अहमद, 19.4)
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 3.4-0-28-3, जसप्रित बुमराह 4-0-14-1, ऍडम मिल्ने 3-0-33-0, कृणाल पंडय़ा 3-0-30-1, राहुल चहर 4-0-19-3, केरॉन पोलार्ड 2-0-10-0.
पुन्हा बोल्टचे शेवटचे षटक आणि पुन्हा मुंबई इंडियन्स विजयी!
सनरायजर्स हैदराबादला या लढतीतील शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता असताना किवीज जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला आणि ही चाल मुंबईसाठी आणखी एकदा यश मिळवून देणारी ठरली. डावखुऱया बोल्टने भुवनेश्वर व खलील अहमद यांचा त्रिफळा उडवला आणि हैदराबादचा डाव 137 धावात संपुष्टात आला. यापूर्वी, केकेआरविरुद्ध देखील बोल्टने शेवटच्या षटकातच मुंबईला दणकेबाज विजय मिळवून दिला होता.