आयपीएल हंगामात मुंबई अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
पुणे / प्रतिनिधी
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन तगडे संघ आज (बुधवार दि. 6) परस्परांशी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स आपल्या गुणांचे खाते उघडणार की कोलकता आपली विजयी कामगिरी कायम ठेवणार, याकडे क्रिकेटशौकिनांचे लक्ष असणार आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सायंकाळी साडेसात वाजल्यापासून रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत दोन सामने झाले असून, संघाला अजून लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
कोलकाता नाईट रायडर्सचे तीन सामने झाले असून, त्यातील 2 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर एका लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई विजयी ट्रकवर परतणार, की कोलकता नाईट रायडर्स आपली विजयी घौडदौड कायम ठेवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
दिल्ली आणि राजस्थाकडून मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता तर, कोलकाताने पंजाब आणि चेन्नईविरुद्ध विजय मिळविले आणि बेंगळूरकडून त्यांना हार पत्करावी लागली होती.
मुंबईकडे रोहित शर्मा, इशान किशन, कॅरेन पोलार्ड, टिळक वर्मा, अनमोलप्रीतसिंह, टिम डेविड, डॅनियल सॅम्स अशी फलंदाजीची फळी आहे. पण, मुख्यतः मुंबईची फलंदाजी रोहित शर्मा, इशान किशन आणि पोलार्डवरच अवलंबून आहे. मुंबईला विजय मिळवायचा असेल, तर या तिघांपैकी किमान दोघांना टिकून धावा करणे गरजेचे आहे. सूर्यकुमार यादव संघात नसल्याने फलंदाजी कमकुवत झाली आहे.
जसप्रित बुमराह, बसिल थम्पी, तिमल मिल्स यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल, तर मॉर्गन, अश्विन, मयंक मार्केंड हे फिरकीची बाजू सांभाळतील. ट्रेंट बोल्ट, पॅटिन्सन, राहुल चहर यांना मुंबईला सोडले असल्याने गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे. जोफ्रा आर्चरला मुंबईने विकत घेतले. पण, तो दुखापतीमुळे या हंगामात उपलब्ध नसेल, हे यापूर्वीच स्पष्ट होते.
कोलकात्याचे पारडे जड
कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर हे डावाची सुरुवात करतील. त्यानंतर श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शेल्डॉन जॅक्सन अशी फलंदाजांची फळी आहे. रसेलने मागील मॅचमध्ये 31 चेंडूत 70 धावा करून विजयात प्रमुख वाटा उचलला होता. त्याच्याकडून अशाच खेळीची कोलकात्याला अपेक्षा असेल. उमेश यादव, शिवम मावी, हे जलदगती गोलंदाजीची बाजू सांभाळतील. सुनील नरेन, आंद्रे रसेल यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू असल्याने कोलकात्याचे पारडे जड मानले जात आहे.
प्रतिस्पर्धी संघ
केकेआर ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिका दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शोकिन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, तिमल मिल्स, अर्शद खान, डॅनिएल सॅम्स, डेव्हाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, अर्जुन जुयाल, इशान किशन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
सुर्यकुमार यादवच्या उपलब्धतेविषयी साशंकता कायम
मुंबई इंडियन्सला सुर्यकुमार यादवची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत राहिली असून आजच्या लढतीत तो खेळू शकणार का, हे प्रत्यक्ष नाणेफेकीवेळीच स्पष्ट होऊ शकेल. सुर्यकुमारने मुंबईसाठी अनेकदा सामना जिंकून देणारी खेळी साकारली असून येथे त्याची उपलब्धता विशेष महत्त्वाची असणार आहे. सुर्यकुमार अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरला असला तरी त्याच्या उपलब्धतेविषयी या प्रँचायझीने काहीही तपशील जाहीर केलेला नाही.
बॉक्स
आंद्रे रसेल बहरात परतल्याने केकेआरला दिलासा
स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल बहरात परतला असून केकेआरला यामुळे मोठा दिलासा लाभला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्ध लढतीत रसेलने टोलेजंग षटकार खेचत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले होते. आता तोच धडाका येथेही कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. आघाडीवीर अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यर मागील लढतीत अपयशी ठरले होते. त्याची येथे भरपाई करण्याचा या जोडीचा प्रयत्न असेल. कर्णधार श्रेयस अय्यरने बऱयापैकी चुणूक दाखवली असली तरी त्याच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा बाकी आहे. नितीश राणाही अद्याप पूर्ण बहरात आलेला नाही.