लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल साखळी सामना आज
मुंबई / वृत्तसंस्था
प्ले-ऑफच्या शर्यतीतून यापूर्वीच जवळपास बाहेर पडलेल्या आणि विविध आघाडय़ांवर कमालीचे झगडत असलेल्या मुंबई इंडियन्सची आज (रविवार दि. 24) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल साखळी लढत होत आहे. मुंबईला यंदा आतापर्यंत सलग 7 पराभव पत्करावे लागले असून आजच्या लढतीत तरी ही अपयशी मालिका खंडित करण्याचा पराक्रम ते गाजवू शकणार का, याची उत्सुकता असेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.
लखनौचा संघ यंदा 7 सामन्यात 4 विजयासह उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. पण, मागील लढतीत त्यांना आरसीबीविरुद्ध 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौने यंदा पहिल्या टप्प्यातील लढतीत मुंबईला 18 धावांनी मात दिली होती, ही त्यांची जमेची बाजू ठरु शकेल.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी काही टप्प्यात उत्तम कामगिरी केली. पण, सांघिक खेळाच्या निकषावर त्यांनी सर्व 7 सामन्यात केवळ निराशाच केली आहे. आयपीएल इतिहासात पहिले सातही सामने हरणारा मुंबई हा पहिलाच संघही ठरला आहे. स्वतः रोहित शर्माने नेमके काय चुकते आहे, याबाबत काही सांगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया यापूर्वी दिली आहे. मात्र, रोहित व इशान या दोन्ही सलामीवीरांचा खराब फॉर्म मुख्य कारणांपैकी एक आहे.
चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध हे दोन्ही सलामीवीर अगदी शून्यावरच बाद झाले तर रोहितच्या तुलनेत इशान किशनने अधिक प्रतिकार केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. आतापर्यंत इशानने 191 तर रोहितने 114 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी काही उत्तम डाव साकारले, तसेच काही वेळा युवा फलंदाज डेव्हॉल्ड ब्रेविसला सूर सापडला असला तरी या संघाची मधली फळी एकत्रित एकदाही क्लिक झालेली नाही. अवघ्या 96 धावांसह केरॉन पोलार्ड देखील प्रँचायझींच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोलंदाजीत मुंबई इंडियन्सची भिस्त प्रामुख्याने जसप्रित बुमराहवरच राहत आली असून बुमराह अद्याप अपेक्षा पूर्ण करु शकला नसल्याने या आघाडीवर देखील मुंबईची निराशा झाली आहे. डॅनिएल सॅम्सने चेन्नईविरुद्ध 4 बळी घेतले असले तरी अनुभवी जयदेव उनादकटला शेवटच्या षटकात 17 धावांचे संरक्षण करता न आल्याने मुंबईला याची पराभवाच्या रुपाने किंमत मोजावी लागली आहे. तिमल मिल्स, बसिल थम्पी व फिरकीपटू मुरुगन अश्विन महागडे ठरत आले आहेत.
संभाव्य संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शोकिन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, तिमल मिल्स, अर्शद खान, डॅनिएल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन.
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
लखनौची फलंदाजी मजबूत
केएल राहुलच्या (265 धावा) नेतृत्वाखालील लखनौ संघाची फलंदाजी उत्तम बहरत राहिली असून हेच त्यांचे बलस्थान ठरत आले आहे. केएल राहुलने यापूर्वी दि. 16 एप्रिल रोजी दोन्ही संघ आमनेसामने भिडले, त्यावेळी 60 चेंडूत नाबाद 103 धावांची झुंजार खेळी साकारली होती. या हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो दुसऱया स्थानी विराजमान आहे. सहकारी सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक देखील 215 धावांसह उत्तम बहरात आहे. गोलंदाजीत या संघाची भिस्त अवेश खान, रवि बिश्नोईसह होल्डर, स्टोईनिस यांच्यावर आहे.