प्रतिनिधी /पणजी
मुंबई उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्तीची निवड करण्यासाठी 10 नावांची निवड करण्यात आली असून त्यात काही सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती तसेच वरिष्ठ वकिलांचा समावेश आहे. या दहा मध्ये गोव्यातील दोघा नामवंत वकिलांचा समावेश आहे.
गोवा आणि महाराष्ट्रासाठी मुंबई उच्च न्यायालय हे समान न्यायालय असून या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची निवड सत्र न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र व गोवा बार काऊंन्सिलचे सदस्य असलेले व उच्च न्यायालयात अनेकवर्षे वकिलीचे कामकाज सांभाळण्याचा अनुभव असलेल्या वकिलांची निवड होते.
ज्या दहा नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये पणजीतील प्रख्यात वकील वाल्मिकी मिनेझिस व सर्वोच्च न्यायालयाचे वकील अरुण पेडणेकर यांचा समावेश आहे. चारित्र्याबाबतच्या इतर चाचण्या व परीक्षणात सफल झाल्यास त्यांची न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालयावर नियुक्ती होणार आहे.