मुंबई/प्रतिनिधी
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात प्रकल्पात कंत्राटदारांना बेकायदेशीर मदत करण्यात येत असून अनाकलनीय पद्धतीने पैसे देण्यात आले, असा आरोप अशिष शेलार यांनी केला आहे. याचा मुंबई मनपाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटला बसला. कोस्टल रोड प्रकरणात मुंबई मनपाचा पैसा फुकट चालला आहे. 90 हेक्टर समुद्रात भराव टाकून जागा रिक्लेम केली जाणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. या प्रोजेक्टचा डीपीआर अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे. तो तयार करताना वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला नाही. पर्यावरणात सजकता नसल्याचे कॅगने ताशेरे ओढले आहेत, अशी माहिती शेलार यांनी दिली.
आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा झाल्याचा दावा केला. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचं मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या कन्सल्टंटला कुठे ना कुठे बेकायदेशीर मदत केली जात आहे. त्यांना जास्तीचा पैसा दिला जात आहे. वेगवेगळ्या पॅकेजमधील तीन कंत्राटदार आहेत. त्यांना अवास्तव बिलं दिली जात आहेत. मी जेव्हा आरोप केले होते. तेव्हा पालिकेने असं काही नसल्याचं म्हटलं होतं. तसं लिखीत उत्तर पालिकेने दिलं होतं. माझ्याकडे पुरावे आहेत. 23 एप्रिल 2021चा सीएजी रिपोर्ट आहे. महापालिकेने 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 दरम्यान केलेल्या कोस्टल रोडच्या कामावर कॅगने या अहवालात ताशेरे ओढले आहेत. पालिकेकडून बेकायदेशीर बिले दिली जात आहेत. कंत्राटदारांना विशेष मदत केली जात आहे. मुंबईकरांच्य पैशाची लूट केली जात आहे. हा सर्व भ्रष्टाचार आहे. बनवाबनवी आहे. त्यावेळी मी 1600 कोटीचा तवंग समुद्राच्या पाण्यावर येत असल्याचं म्हटलं होतं. त्याचं एक पान कॅगने खोललं आहे, असं शेलार यांनी सांगितलं.