13 व्या आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, दहा दिवस ‘डबल हेडर’ सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
13 व्या आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयने रविवारी जाहीर केले असून मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात 19 सप्टेंबर रोजी सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक याआधीच जाहीर करण्यात येणार होते. पण कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक स्थितीमुळे त्यांना वेळापत्रक जाहीर करण्यास इतका विलंब झाला आहे. महामारीच्या संकटामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्यात येत आहे.
उद्घाटनाची लढत अबु धाबी येथे शनिवारी होणार आहे. त्यानंतर रविवारी दुबईमध्ये दिल्ली कॅपिटल्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांचा सामना होईल. सोमवारी होणाऱया तिसऱया सामन्यात सनरायजर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांची गाठ पडेल. ‘22 सप्टेंबर रोजी पुढचे सामने शारजाहमध्ये होणार असून राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात येथे पहिला मुकाबला होईल,’ असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
एकूण दहा दिवशी दोन दोन सामने होणार असून यातील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता (यूएई वेळ दु.2 वा.) होईल. सायंकाळी होणारे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता (यूएई वेळ सायं. 6 वा.) खेळविले जाणार आहेत. दुबईमध्ये एकूण 24, अबु धाबीमध्ये 20 व शारजाहमध्ये 12 सामने खेळविले जातील. प्लेऑफ आणि अंतिम लढतींचे वेळापत्रक व त्यांची केंद्रे नंतर जाहीर करण्यात येतील. जैवसुरक्षित वातावरणात होणाऱया या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू, साहायक स्टाफ, प्रशिक्षक यांची वारंवार चाचणी घेतली जाणार आहे.