जुलै महिन्यातही चालणार गाड्या, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी / मिरज
मुंबई, पुणे, मिरज, सोलापूर, बेळगांव आणि हुबळी या मार्गावर धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना जुलै महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये दादर-हुबळी एक्सप्रेस, मिरज-बेंगलोर एक्सप्रेस, सोलापूर-धारवाड एक्सप्रेस, हुबळी-सोलापूर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागाच्या वतीने दररोज धावणाऱ्या नियमित गाड्या रद्द करुन त्याऐवजी विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. या गाड्यांची मुदत 30 जूनपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावरील विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना जुलै महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये दादर-हुबळी (गाडी क्र. 07318), हुबळी-दादर (07317), मिरज-बेंगलोर (06590), बेंगलोर-मिरज (06589), सोलापूर-धारवाड (07321), धारवाड-सोलापूर (07322), हुबळी-सोलापूर (07331), सोलापूर-हुबळी (07332) या गाड्यांचा समावेश आहे.
यापैकी हुबळी-सोलापूर आणि सोलापूर-हुबळी या पॅसेंजर रेल्वे गाड्या अनारक्षित आहेत. तर दादर-हुबळी या गाडीसाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहेत. मिरज-बेंगलोर आणि सोलापूर-धारवाड या गाड्यांसाठी सामान्य शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही मध्य रेल्वेने शनिवारी जाहीर केले.