ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळच्या बोर घाटात तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास बोर घाटातील तीव्र उतारावर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या टेम्पोने पुढील भाजीच्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. ती कार पुढील कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून आदळली तर तो कोंबडय़ाचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला. तसेच दुसरी एक कार कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणाऱ्या ट्रेलर आणि कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्यामध्ये चिरडली गेल्याने या कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक असा तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत झाली आहे.