ऑनलाईन टीम / खोपोली :
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फुडमॉलजवळ मध्यरात्री 12.45 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. टेम्पो, ट्रेलर आणि कार अशा पाच गाड्यांचा अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मृतामध्ये पाच वर्षाच्या एका लहान मुलीचाही समावेश आहे. चार मृतदेह खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर एका जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या अपघातात मंजू प्रकाश नाहर, (वय 58), डॉ. वैभव वसंत झुंझारे, (वय 41), उषा वसंत झुंझारे, (वय 63), वैशाली वैभव झुंझारे, (वय 38 वर्ष) आणि श्रीया वैभव झुंझारे, (वय 5 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.