ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला. या अहवालावर आपली भूमिका मांडताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचे खच्चीकरण व बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असे म्हटले होते. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून सिंग यांची बदनामी केली जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी आता मुंबई सायबर सेलनं दोन गुन्हे दाखल केले आहेत.
या संदर्भात ट्विट करत सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारक मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करत आहेत. त्यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या अकाऊंटधारकांवर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही खाती बनावट आहेत आणि पोलिसांकडून त्या सर्व बनावट खातेदारांवर कारवाई केली जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या, दुसरा गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचा फोटो वापरणाऱ्यांवरही दाखल करण्यात आला आहे. आम्ही या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.