वानखेडे स्टेडियमवर उभय संघांत आयपीएल साखळी सामना
मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल प्ले-ऑफमधील अस्तित्व धोक्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची आज (गुरुवार दि. 12) आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्त्वाची लढत होत आहे. मुंबईचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी हा सामना औपचारिक असेल. सायंकाळी 7.30 वाजता लढतीला सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही संघांसाठी यंदाचा हंगाम अतिशय खराब स्वरुपाचा राहिला आहे. चेन्नईला अद्याप प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशा असली तरी यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आणि अन्य निकाल अनुरुप असणे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असेल. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मागील लढतीत 91 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला असून यामुळे येथे त्यांचे मनोबल उंचावलेले असू शकते.
सलामीवीर डेव्हॉन कॉनवे उत्तम बहरात असून त्याने लागोपाठ तीन अर्धशतके झळकावली आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांचा तर त्याने जोरदार समाचार घेत 87 धावांची शानदार खेळी साकारली होती. येथे ऋतुराज गायकवाडच्या साथीने आणखी आक्रमक सुरुवात करण्याचा त्याचा निर्धार असू शकतो. ऋतुराजला सूर सापडला असला तरी अद्याप त्याला सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे, त्यालाही आपला खेळ उंचवावा लागेल.
रविंद्र जडेजा दुखापतीमुळे मागील सामन्यातून बाहेर राहिल्याने गूढ निर्माण झाले होते. आता या लढतीत तो संघात परतणार का, हे पहावे लागेल. हे दोन्ही संघ पहिल्या टप्प्यातील लढतीत आमनेसामने भिडले, त्यावेळी सर्वोत्तम फिनिशर धोनीने शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय प्राप्त करुन दिला होता.
चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा साकारत दिल्लीला 117 धावांवर गुंडाळले होते. मोईन अलीने 3 बळी घेतले तर युवा मध्यमगती गोलंदाज मुकेश चौधरी व सिमरजीत सिंग यांनीही समयोचित मारा केला. मुख्य फिरकीपटू महिश तीक्षणाची 4 षटके महत्त्वाची ठरु शकतात. याशिवाय, ब्रेव्हो मोक्याच्या क्षणी भागीदारी मोडू शकतो.
संभाव्य संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शोकिन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, ट्रिस्टॅन स्टब्ज, कुमार कार्तिकेय सिंग, डॅनिएल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तीक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
मुंबई इंडियन्ससाठी उर्वरित सर्व सामने ‘डेड रबर्स’!
या हंगामात सर्वात खराब प्रदर्शन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला असून त्यांच्यासाठी उर्वरित सर्व लढती डेड रबर्स असणार आहेत. उर्वरित फेऱयांमध्ये आता सरस फलंदाजीवर भर देणे हा त्यांचा प्राधान्यक्रम असेल.
कर्णधार रोहित शर्मा (200 धावा), इशान किशन (321) यांनी फ्लाईंग स्टार्ट देणे आवश्यक असेल. शिवाय, यापूर्वी केकेआरविरुद्ध अपयशी ठरलेल्या मध्यफळीतील फलंदाजांना सूर सापडणे देखील क्रमप्राप्त असेल. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असून या पार्श्वभूमीवर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, केरॉन पोलार्ड यांच्यावर अधिक जबाबदारी असेल.
गोलंदाजीत बुमराहने आयपीएल इतिहासात प्रथमच 5 बळी घेण्याचा पराक्रम मागील लढतीत गाजवला असला तरी त्याला डॅनिएल सॅम्स, रिले मेरेडिथ व कुमार कार्तिकेय सिंग यांची साथ लाभणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.