ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगी न घेता अनधिकृत हॉटेल सुरु केले असल्याचा ठपका बीएमसीने ठेवला आहे. एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असे बीएमसीने जुहू पोलिसांना सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीने चार जानेवारी रोजी जुहू पोलिसात दाखल केली असून या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केले आहे. असे निदर्शनास आले आहे की, सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे. इमारतमधील बदल करण्यापूर्वी मी महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) मंजुरीसाठी थांबले होते, असे सोनू सूदने यावेळी स्पष्ट केले आहे.