ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे हाहाकार माजला आहे. मागील 24 तासात 2 लाख पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईत तर रुग्णांसाठी आता बेडची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे.
यानुसार आता मुंबईतील पाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. महापालिकेने सांगितले की, सध्या तरी दोन हॉटेलमध्ये खाजगी रुग्णालयाचा भाग म्हणून काम करण्यास परवानगी मिळाली आहे. या दोन हॉटेल्समध्ये 42 बेड उपलब्ध होणार आहेत.
पालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात आणखी काही हॉटेल्सना यामध्ये जोडले जाणार आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर नाही अशा रुग्णांना खासगी रुग्णालयातून हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र ही प्रक्रिया करण्याआधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संमती आवश्यक असणार आहे.
या हॉटेलमधील रुग्णालयात 24 तास डॉक्टर, नर्स, औषधे आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचे शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत असेल.